
स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमी (Xiaomi) आता गाड्यांच्या मार्केटमध्ये उतरत आहे. शाओमीने चीनमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार Xiaomi SU7 Sedan च्या सेल लायसेन्ससाठी अर्ज केला आहे. यानंतर कंपनीने या गाडीचे काही फोटोही शेअर केले आहेत. या गाडीचे मॅन्युफॅक्चरिंग बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेड (BAIC) द्वारे करारानुसार केले जाईल.
यापूर्वी ही इलेक्ट्रिक कार टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे आणि ती आधी MS11 या कोडनेमने ओळखली जात होती. आता या गाडीसंबंधित काही विशेष माहिती देखील समोर आली आहे, ज्यामध्ये वजन, पॉवर आउटपुट आणि व्हेरिएंट इत्यादी गोष्टींबाबत सांगितले जाईल.
चीनमधील प्रत्येक गाडीला बाजारात येण्यापूर्वी स्थानिक नियामकाकडून मान्यता घ्यावी लागते आणि उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MIIT) दर महिन्याला होमोलोगेशन प्रोसेसमधून जाणाऱ्या गाड्यांची यादी प्रसिद्ध करते. काही कंपन्या या प्रोसेसवर नाराज आहेत, कारण या प्रोसेसमुळे त्यांच्या लाँचपूर्वीच गाड्यांचे फोटो आणि फीचर्स लीक होण्याची भीती असते.
हेही वाचा – 2026 पर्यंत भारतात येणार इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, 7 मिनिटांत 27 किमी कापणार!
Xiaomi च्या या गाडीची लांबी 4997 मिमी, रुंदी 1,963 मिमी, उंची 1455 मिमी आणि व्हीलबेस 3000 मिमी आहे. एका रिपोर्टनुसार, यात दोन भिन्न व्हील आकाराचे पर्याय असतील जे अनुक्रमे 19 इंच आणि 20 इंच असतील. कंपनीने या कारचे दोन व्हेरिएंट्स आणले आहेत.
फोटोंमधून असे दिसते, की या गाडीत फेस रेकग्निशन लॉक/अनलॉक सिस्टीम दिली जाऊ शकते. म्हणजे, तुम्ही कारसमोर आल्यावर हा कॅमेरा चेहरा ओळखून कार अनलॉक करेल. मात्र, अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. ही 5 सीटर सेडान कार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या बेस मॉडेलचे वजन 1,980 किलो आहे. टॉप मॉडेलचे वजन 2,205 किलो आहे आणि त्याचा टॉप स्पीड 265 किमी/तास असेल.
या गाडीचे उत्पादन पुढील महिन्यात डिसेंबरपासून सुरू होईल आणि त्याची विक्री आणि वितरण फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. Xiaomi ची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. या कारशी संबंधित सर्व माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही कार सर्वप्रथम चीनच्या बाजारात लाँच केली जाईल.