
Car Run 9,99,999 km : कारमधील तांत्रिक बिघाड तुम्ही आतापर्यंत अनेकदा वाचले किंवा ऐकले असतील. त्यानंतर लोक कार कंपन्यांकडून पार्ट बदलण्याची किंवा दुरुस्तीची मागणी करत असतात. पण नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कॅनेडियन भारतीय अरुण घोष हे Honda Accord सेडान कारचे मालक आहेत आणि आता त्यांच्या कारचे ओडोमीटर काम करत नाही, त्यामुळे त्यांनी कार कंपनीकडे विशेष मागणी केली आहे.
घोष यांनी त्यांच्या कारमध्ये 9,99,999 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे आणि आता त्यांचे ओडोमीटर पुढील संख्या दर्शवत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या घोष यांनी कार कंपनीकडे विशेष ओडोमीटरची मागणी केली आहे. घोष होंडाकडून कस्टमाइज 7 अंकी ओडोमीटरची मागणी करत आहेत जेणेकरुन ते भविष्यात त्याच्या आवडत्या कारचे ड्रायव्हिंग रेकॉर्ड ठेवू शकेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मूळचे केरळचे असलेले घोष 2017 मध्ये कॅनडाला गेले. जिथे त्यांनी त्यांची ड्रीम कार होंडा एकॉर्ड खरेदी केली. घोष यांना कार चालवण्याची खूप आवड आहे. जेव्हा त्यांच्या कारने 5 लाख किमी पूर्ण केले तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना 10 लाख किमी पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले. अलीकडेच, 30 जुलै 2024 रोजी जेव्हा त्यांची कार 10 लाख किमी पूर्ण करण्यापासून 100 किमी अंतरावर होती, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता.
त्यानंतर ते आपल्या मित्रासोबत ड्राईव्हवर गेले, जेणेकरून 1 मिलियन किमीचे टार्गेट पूर्ण करता येईल. पण प्रवास पूर्ण होत असताना कारचे ओडोमीटर 9,99,999 किमीवर थांबले. कारण त्यात 7 अंक दाखवण्याची यंत्रणा नव्हती.
कारमध्ये कस्टमाइज ओडोमीटर बसवण्यासाठी घोष यांनी त्यांच्या स्थानिक होंडा डीलरशीपशी संपर्क साधला आहे. ओंटारियोच्या सेंट कॅथरीन्स येथील होंडा डीलरशिपचे संचालक शमील बेचरभाई यांना कारचे ओडोमीटर पाहून आश्चर्य वाटले. सीबीसी न्यूजला दिलेल्या निवेदनात शमिल म्हणाले, “माझ्या 20 वर्षांच्या व्यवसायात, मी एवढ्या लांब अंतर कापणारी कार कधीही पाहिली नाही. याआधी माझ्या माहितीनुसार सर्वात जास्त प्रवास करणाऱ्या कारने अंदाजे 5,50,000 किमी अंतर कापले होते.” सध्या डीलरशिपही घोष यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.