
Tata Motors : कमी किमतीत टाटा मोटर्सच्या गाड्या खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण टाटा मोटर्सने जानेवारी 2025 पासून त्यांच्या संपूर्ण लाइनअपच्या किमती अपडेट करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही सध्याच्या किमतीत कार खरेदी करू शकाल. ही दरवाढ पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या वाहनांवर लागू होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, सातत्याने वाढणाऱ्या इनपुट कॉस्ट आणि महागडी लॉजिस्टिक आणि महागाई यामुळे वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सर्व वाहनांच्या एक्स-शोरूम किमतीत अंदाजे 3 टक्क्यांनी वाढ केली जाईल. मात्र, कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढणार हे सांगण्यात आलेले नाही. हे विविध मॉडेल्स आणि प्रकारांवर अवलंबून असेल.
टाटा मोटर्स व्यतिरिक्त मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, एमजी मोटर्स आणि महिंद्रा यांनीही जानेवारीपासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती 4% ने वाढवण्याची घोषणा केली आहे. ह्युंदाई कारच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवणार आहे.
हेही वाचा – 14 लाखांची माती..! पैसे घेतले, गाडीचा हप्ता सुरु झाला, Skoda कंपनीने हात वर केले!
याशिवाय, एमजी मोटर्सने आपल्या कारच्या किमती 3% आणि कियाने 2% ने वाढवण्याची घोषणा केली आहे. या सर्व कंपन्यांनी इनपुट कॉस्ट आणि इन्फ्लेशनचाही हवाला दिला आहे.
इलेक्ट्रिक कार महागणार
टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आघाडीवर आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tiago EV, Tigor EV, Nexon EV, Punch EV आणि Curve EV सह अनेक इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांच्या किमतीही वाढणार आहेत.
गेल्या नोव्हेंबरमध्ये टाटा मोटर्सने प्रवासी कार विभागात 2 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली होती. कंपनीने या महिन्यात 47,117 युनिट्सची विक्री केली आहे. जे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 46,143 युनिट होते.