६ महिन्यांसाठी गडकरींना दुबईला पाठवा! दुबईच्या प्रिन्सने PM मोदींसमोर अचानक अशी मागणी का केली?

WhatsApp Group

Dubai Crown Prince On Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी नुकत्याच एका सभेत सांगितलेली गोष्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यांनी दावा केला की, दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक अनोखी मागणी केली होती – ती म्हणजे “गडकरींना 6 महिन्यांसाठी दुबईला एक्सपोर्ट करा”!

हैदराबाद हाऊसमधील गुपित किस्सा

गडकरींनी आपल्या भाषणात सांगितले की, ही घटना हैदराबाद हाऊस, दिल्ली येथे पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान घडली. त्या बैठकीला पंतप्रधान मोदी, दुबईचे प्रिन्स शेख हमदान आणि भारत सरकारचे अनेक मंत्री उपस्थित होते. बैठकीदरम्यान शेख हमदान यांनी थेट पंतप्रधानांना म्हटले, “आमच्यावर एक उपकार करा – गडकरींना 6 महिन्यांसाठी दुबईला पाठवा.”

हे वाक्य ऐकून पंतप्रधानांसकट सर्व उपस्थित मंडळी हसू लागले. गडकरींनी सांगितले की, त्यावेळी प्रिन्स गडकरींच्या कामगिरीने अत्यंत प्रभावित झाले होते. याच बैठकीनंतर प्रिन्सने त्यांना दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये खास आमंत्रित केले होते.

गडकरींच्या कामगिरीची दुबईतही दखल

नितिन गडकरी यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, त्यांच्या विभागाच्या कार्यकुशलतेमुळे आतापर्यंत 7 ते 9 जागतिक विक्रम नोंदवले गेले आहेत. देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावापर्यंत उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले आहे.

ते म्हणाले, “पूर्वोत्तर राज्यांपासून ते दुर्गम भागांपर्यंत आज सर्वत्र रस्त्यांचे काम कौतुकास्पद आहे. अगदी गावागावातील नागरिक आणि ऑटो रिक्षा चालक देखील आता म्हणतात की रस्त्यांची स्थिती पूर्वीपेक्षा कितीतरी सुधारली आहे.”

दुबईच्या प्रिन्सचा भारत दौरा

8 एप्रिल 2025 रोजी दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तूम यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी विविध धोरणात्मक चर्चा पार पडल्या आणि भारताच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीवर प्रिन्सनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.

गडकरींच्या नेतृत्वाखाली भारतात रस्ते व पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेली प्रगती पाहून दुबईचे प्रिन्सही भारावून गेले, आणि म्हणूनच त्यांनी असे विनोदातच पण गर्भित अर्थाने मोदींना विनंती केली – “गडकरींना आम्हाला काही महिन्यांसाठी द्या!”

Leave a Comment