
Buying Car On Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशात लाखो वाहनांची डिलिव्हरी होते. तुम्ही तुमच्या नवीन वाहनाची डिलिव्हरी देखील घेणार असाल, तर तुम्ही PDI करणे आवश्यक आहे. PDI म्हणजे “प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन”. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ग्राहक कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी त्याची तपासणी करतो. यामध्ये गाडीचे आतील आणि बाहेरील दोन्ही भाग तपासले जातात. गाडीची डिलिव्हरी मिळण्यापूर्वी PDI आवश्यक आहे. त्यामुळे गाडी चांगल्या स्थितीत आहे आणि त्यात कोणतेही दोष नाहीत याची खात्री करण्यात ग्राहकांना मदत होते. जर ग्राहकाला स्वत:ला गाड्यांबद्दल फारसे ज्ञान नसेल, तर PDI साठी एखाद्या मॅकेनिकला सोबत घ्या ज्याला गाड्यांबद्दल माहिती असेल.
PDI म्हणजे काय?
PDI मध्ये, कारची बॉडी, पेंट, खिडक्या, हेडलाइट्स, टेललाइट्स, इंटीरियर, सीट्स, दरवाजे, पॅनल्स, इंजिन, ट्रान्समिशन आणि इंफोटेनमेंट सिस्टम, ऑडिओ सिस्टम इत्यादी इलेक्ट्रॉनिक घटकांची कसून तपासणी केली जाते. PDI साठी, कार चांगल्या प्रकाशात ठेवा आणि सर्व भाग काळजीपूर्वक तपासा. गाडीत काही बिघाड असल्यास त्याची तात्काळ नोंद घ्यावी.
हेही वाचा – कार इश्युरन्सचा प्रीमियम कमी करण्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरा, तुमचे पैसे वाचतील!
काही दोष आढळल्यास काय करावे?
PDI दरम्यान कारमध्ये काही दोष आढळल्यास, ग्राहकाने डीलरकडे तक्रार करावी. बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी कार उत्पादक किंवा डीलरची असेल. तुम्ही डीलरकडून दुसऱ्या युनिटची मागणी देखील करू शकता. डीलरशिप तुम्हाला तेच दोषपूर्ण युनिट देण्याचा प्रयत्न करत असेल, तर कार निर्मात्या कंपनीकडे तक्रार करा कारण तुम्ही सदोष कारची डिलिव्हरी घेतल्यास तुमच्या पैशाचा अपव्यय होईल.