E20 पेट्रोल वापरताय? मग लक्ष द्या! गाड्यांचं मायलेज घटलं, इंजिनमध्ये दोष वाढले!

WhatsApp Group

E20 Fuel Problems : भारतामध्ये पर्यावरणपूरक इंधन म्हणून E20 फ्यूलचा वापर झपाट्याने वाढत आहे. परंतु या बदलामुळे वाहनधारकांच्या चिंतेत भर पडली आहे. 20 टक्के इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे, तर इंजिन आणि फ्यूल सिस्टममध्ये बिघाड वाढत आहेत, असा धक्कादायक निष्कर्ष नुकत्याच झालेल्या सर्व्हेत समोर आला आहे.

मायलेज घसरलं, खर्च वाढला

Business Standard च्या अहवालानुसार, LocalCircles या संस्थेने केलेल्या सर्व्हेत भारतातील 323 जिल्ह्यांमधून 36 हजारांहून अधिक प्रतिसाद मिळाले. त्यापैकी 10 पैकी 8 वाहनमालकांनी E20 फ्यूल वापरल्यानंतर मायलेज कमी झाल्याचे मान्य केले आहे. ऑगस्ट महिन्यात 67% लोकांनी मायलेज घसरल्याची तक्रार केली होती, आणि फक्त दोन महिन्यांत हे प्रमाण वाढून 80% पर्यंत गेले आहे.

इंजिनची झीज आणि महागडी देखभाल

फक्त मायलेजच नाही, तर इंजिन, फ्यूल लाइन, टँक आणि कार्बोरेटरसारख्या महत्त्वाच्या पार्ट्सवरही E20 चा परिणाम होत आहे. सर्व्हेत 52% वाहनमालकांनी गाडीमध्ये बिघाड किंवा दुरुस्तीची गरज वाढल्याचे सांगितले आहे. ऑगस्टमध्ये हा आकडा 28% होता, जो ऑक्टोबरमध्ये दुप्पट झाला आहे. मेकॅनिकांच्या मते, फ्यूल इंजेक्टर फेल होणे, दोनचाकी वाहनांमध्ये मिसफायरिंग, आणि टँकमध्ये गंज येणे अशा समस्या आता सामान्य झाल्या आहेत.

हेही वाचा – Tata Curvv EV ‘या’ राज्याच्या पोलिसांची बनलीय गाडी, 585 किमीच्या रेंजसह प्रीमियम फीचर्स!

सरकारचे दावे आणि वास्तव

सरकारचे म्हणणे आहे की E20 फ्यूलमुळे वाहनांचे नुकसान होणार नाही. पण वास्तव वेगळं सांगतंय. जुनी वाहने E20 वापरू लागल्यापासून त्यांचे पार्ट्स वेगाने झिजत आहेत.
म्हणजेच, ज्या लोकांकडे 2023 पूर्वी खरेदी केलेली वाहने आहेत, त्यांच्यासाठी E20 फ्यूल महागडं ठरतंय — कारण मायलेज कमी, आणि मेंटेनन्स खर्च जास्त!

पर्यावरणाचा फायदा, पण मध्यमवर्गीय त्रस्त

E20 फ्यूलचा उद्देश प्रदूषण कमी करणे आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे हा असला, तरी मध्यमवर्गीय वाहनमालक मात्र आर्थिकदृष्ट्या दबले जात आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार, गन्न्यावर आधारित इथेनॉल CO₂ उत्सर्जनात 65% घट करतो, तर मका-आधारित इथेनॉल 50% उत्सर्जन कमी करतो. परंतु, लोकांचे म्हणणे आहे की जर सरकारने हे इंधन किमान 20% स्वस्तात विकले, तर ते त्यास समर्थन देतील.

आता E27 फ्यूल येणार?

दरम्यान, सरकार आता E27 फ्यूल आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु तज्ज्ञांचे मत आहे की, ज्या वेगाने सरकार एथेनॉल मिश्रण वाढवत आहे, त्या वेगाने लोक नवीन वाहने घेऊ शकत नाहीत. E20 कंप्लायंट कार घेतल्यावर जर लगेच E27 बाजारात आले, तर जुनी गाडी परत चिंतेचं कारण ठरेल. त्यामुळे सरकारने नवे नियम आणण्याआधी वाहनमालकांना तयार होण्यासाठी वेळ देणे अत्यावश्यक आहे.

Leave a Comment