
GST On Used Cars : सेकंड हँड कारच्या विक्रीवरील जीएसटीबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. अलीकडेच जीएसटी काऊन्सिलने सेकंड हँड कारच्या विक्रीच्या मार्जिनवर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये 1200 सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमता असलेली पेट्रोल आणि डिझेल वाहने, 4000 मिमी किंवा त्याहून अधिक लांबीची वाहने आणि 1500 सीसी किंवा त्याहून अधिक इंजिन क्षमतेची वाहने यांचा समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेतही या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. मात्र, सरकारच्या या निर्णयावर जनतेने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली.
आता जर तुम्हाला एका ओळीत गोंधळ दूर करायचा असेल, तर जाणून घ्या, जर तुम्ही जुन्या कार खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकत असाल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा अर्थ 12 लाख रुपयांना खरेदी केलेली कार काही वर्षांनी 9 लाख रुपयांना विकली तर कोणताही कर भरावा लागणार नाही. गाडी माणसाच्या नावावर असो किंवा कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असो. म्हणजेच तोट्यात कार विकण्यावर जीएसटी नाही.
सामान्य माणसाने जुनी कार विकली किंवा विकत घेतली तर त्यावर कोणताही कर लागणार नाही. ती गाडी विकून नफा असला तरी. उदाहरणावरून समजून घेऊ – आदित्यने एक जुनी कार 1 लाख रुपयांना खरेदी केली, आणि काही काळानंतर ती 1.50 लाख रुपयांना विकली, त्यावर पंकजला 50 हजार रुपयांचा नफा होत आहे. पण जीएसटी नियम सांगतो की पंकजला एक रुपयाही जीएसटी भरावा लागणार नाही.
कुठे कर लावला जाईल?
जीएसटी परिषदेने आपल्या 55 व्या बैठकीत वापरलेल्या कारवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी 1200 सीसी आणि 4 हजार मि.मी. पर्यंत लांबीच्या जुन्या गाड्यांवर 12% जीएसटी आकारण्यात आला. यामध्ये ईव्ही आणि इतर वाहनांचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु जीएसटी नोंदणीकृत वापरलेल्या कारचा व्यवसाय करणाऱ्यांनाच हे लागू होईल. म्हणजे गाडी विकणाऱ्या सर्वसामान्यांना हा नियम लागू होणार नाही.
जीएसटीचा हा दर केवळ वापरलेल्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवरच लागू केला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. त्यांना जीएसटी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, अशी अट आहे. म्हणजेच स्पिनी, कार ट्रेड, कार देखो, कार 24 सारख्या वापरलेल्या वाहनांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना 18% जीएसटी भरावा लागेल. परंतु त्यांना केवळ नफ्याच्या मार्जिनवर कर भरावा लागेल.
उदाहरणाने समजून घेऊया…
जर तुम्ही तुमची जुनी कार कार ट्रेडला 5 लाख रुपयांना विकली असेल. यावर तुम्हाला कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही. पण जर कार ट्रेडने काही बदल (म्हणजे दुरुस्ती) करून ती कार ग्राहकाला 6 लाख रुपयांना विकली. कार ट्रेडने दुरुस्तीसाठी सुमारे 50 हजार रुपये खर्च केले. अशाप्रकारे कारची किंमत 5.50 लाख रुपये झाली आणि त्याने ही कार 6 लाख रुपयांना विकली, म्हणजेच या कारवर त्याला 50 हजार रुपयांचा नफा झाला. आता या नफ्याच्या मार्जिनवर 18% जीएसटी म्हणजेच Rs 9000 जीएसटी भरावा लागेल.