टाटा मोटर्सवर सायबरहल्ला, जग्वार लँड रोव्हर कारखाना बंद करावा लागला, अब्जावधींचे नुकसान!

WhatsApp Group

Tata Motors Cyberattack : टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover – JLR) या ब्रिटनस्थित नामांकित वाहननिर्मिती कंपनीवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे कंपनीचं संपूर्ण उत्पादन ठप्प झालं आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनीच्या सोलिहुल, हेलीवुड आणि वॉल्वरहँप्टन या तीन प्रमुख प्लांट्सवर एक मोठा सायबर अटॅक झाला होता. त्यामुळे उत्पादन पुन्हा सुरू करण्याची 24 सप्टेंबरची योजना आता पुढे ढकलली गेली असून, 1 ऑक्टोबरपर्यंत प्लांट बंदच राहणार आहे.

कोणत्या हॅकर ग्रुपने केला हल्ला?

“Scattered Lapsus$ Hunters” या हॅकर ग्रुपने या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर कंपनीने आपले सर्व युनिट्स तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. ही तीन मुख्य फॅक्टरी दररोज सुमारे 1,000 वाहनांचं उत्पादन करतात आणि जवळपास 30,000 डायरेक्ट कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. शिवाय, एक लाखांहून अधिक लोक या सप्लाय चेनशी अप्रत्यक्षरीत्या जोडलेले आहेत.

23 हजार कोटींचा संभाव्य तोटा!

या सायबर हल्ल्यामुळे कंपनीला जवळपास 2 बिलियन पाउंड (सुमारे 23 हजार कोटी रुपये) तोटा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम JLR च्या संपूर्ण आर्थिक वर्ष FY25 च्या अंदाजित नफ्यापेक्षा (1.8 बिलियन पाउंड) देखील जास्त आहे. कंपनीकडे कोणतंही सायबर इन्शुरन्स नसल्यामुळे हा संपूर्ण आर्थिक भार कंपनीवरच येणार आहे.

शेअर मार्केटवर परिणाम

या घटनेचा थेट परिणाम टाटा मोटर्सच्या शेअर्सवरही दिसून आला आहे. गेल्या 5 दिवसांत टाटा मोटर्सचा शेअर घसरत 664 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र, भारतीय युनिट्स आणि इतर देशांतील ऑपरेशन्सवर या हल्ल्याचा कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – डिझेल महाग पडलंय? मग हाच इलेक्ट्रिक ट्रक घ्या – फक्त ५.९९ लाखात!

JLR टाटा मोटर्ससाठी किती महत्त्वाची?

हे लक्षात घ्या की, टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात 70% वाटा फक्त JLR या कंपनीचा आहे. त्यामुळे उत्पादन ठप्प झाल्याने केवळ JLR नव्हे तर टाटा मोटर्सच्या एकूण आर्थिक स्थितीवरही परिणाम होण्याची भीती आहे.

सायबर हल्ल्यांचं वाढतं संकट

सध्या जगभरात मोठ्या कंपन्यांवर सायबर हल्ल्यांचं संकट गडद होत चाललं आहे. यापूर्वीही मार्क्स & स्पेंसर ग्रुप, तसेच इतर रिटेल साखळ्यांवर असेच हल्ले झाले होते. मात्र, जग्वार लँड रोव्हरवर झालेला हल्ला त्याच्या व्यापकतेमुळे विशेष लक्षवेधी ठरतो आहे.

Leave a Comment