CNG Car : जर तुमच्याकडे सीएनजी गाडी असेल तर तुम्ही हे लक्षात घेतले असेल की जेव्हाही तुम्ही सीएनजी भरायला जाता तेव्हा तुम्हाला गाडीतून उतरावे लागते. त्यानंतरच तुमच्या कारमध्ये गॅस भरण्याचे काम केले जाते. बहुतेक लोकांना याबाबत योग्य माहिती नसते. मात्र, हे करण्यामागचा उद्देश चालक आणि प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचा असतो. यामागे अनेक तांत्रिक आणि सुरक्षेशी संबंधित कारणे आहेत, जी प्रत्येक सीएनजी कार मालकाने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सीएनजी हा उच्च दाबाचा वायू आहे. तो भरताना व्हॉल्व्ह किंवा पाईपमध्ये काही दोष आढळल्यास गॅस गळती होण्याची शक्यता असते. लीक झालेला गॅस कारच्या आतील भागात भरू शकतो, ज्यामुळे गुदमरणे किंवा आग लागणे यासारख्या घटना घडू शकतात.
कारच्या आतील घर्षणामुळे स्थिर वीज तयार होऊ शकते. गॅस गळती झाल्यास, या लहान ठिणगीमुळे आग लागू शकते. बाहेर राहून हा धोका कमी होऊ शकतो.
सीएनजी ज्वलनशील आहे. कुठेही गॅस गळती झाल्यास आणि स्पार्क त्याच्या संपर्कात आल्यास आग लागू शकते. बाहेर राहून तुम्ही हा धोका टाळू शकता.
हेही वाचा – तब्बल 100 वर्षानंतर Jaguar ने बदलला जुना आणि आयकॉनिक लोगो!
सीएनजी भरताना अपघात झाला तर गाडीत अडकलेल्या लोकांना त्वरीत बाहेर काढणे कठीण होऊ शकते. बाहेर राहिल्यास आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सुरक्षित ठिकाणी पोहोचता येते.
अनेक देश आणि राज्यांमध्ये सीएनजी भरताना सर्व प्रवाशांनी गाडीतून बाहेर पडण्याचे नियम केले आहेत. पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाते.
गाडीच्या आत बसल्यास काय होईल?
गॅस गळती झाल्यास, कारच्या आत गॅस भरण्यास सुरवात होईल, ज्यामुळे गुदमरणे किंवा बेशुद्ध होण्याचा धोका असतो. आग लागल्यास कारमध्ये अडकणे प्राणघातक ठरू शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड किंवा पंपमधून गॅस भरण्यास नकार दिला जाऊ शकतो.