
तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. परवडणाऱ्या गाड्या आणि परवडणाऱ्या मेंटेनेन्ससाठी बेस्ट कंपनी असलेली मारुती सुझुकी (Maruti Suzuki Car Price Hike In Marathi) आता ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये या किमती वाढवण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. एकूण महागाई आणि वस्तूंच्या वाढलेल्या दरांमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते.
किंमत किती वाढणार?
मारुती सुझुकी कमी किमतीच्या छोट्या कार अल्टोपासून इन्व्हिक्टोपर्यंत अनेक गाड्यांची विक्री करते. त्यांची किंमत 3.54 लाख ते 28.42 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. मात्र, या किमती किती वाढवल्या जाणार याबाबत कंपनीकडून सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की व्हेरिएंटनुसार किंमतींमध्ये वाढ होईल.
मारुती सुझुकी इंडियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की एकूण महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या किमतींमुळे खर्चाचा दबाव वाढल्याने कंपनीने जानेवारी 2024 मध्ये आपल्या कारच्या किमती वाढवण्याची योजना आखली आहे. या वर्षी 1 एप्रिल रोजी देखील मारुती सुझुकीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवल्या होत्या. यापूर्वी, जानेवारी 2023 मध्ये, कंपनीने सांगितले होते की त्यांनी त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमती सुमारे 1.1% ने वाढवल्या आहेत.
हेही वाचा – ह्युंदाईच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने लोकांना अक्षरश: लावले वेड, रेकॉर्ड प्रमाणात विक्री!
जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीनेही कच्च्या मालाची वाढती मागणी आणि ऑपरेटिंग खर्चाचा हवाला देत पुढील वर्षी जानेवारीपासून भारतात आपल्या वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. ऑडी इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, किंमत वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. ऑडी इंडिया Q3 SUV ते स्पोर्ट्स कार RSQ8 पर्यंतच्या गाड्या विकते, ज्यांची किंमत रु. 42.77 लाख ते रु. 2.22 कोटी आहे.