संपूर्ण जगात ऑटोमोबाईल क्षेत्र वेगाने वाढत आहे परंतु जर आपण भारताबद्दल बोललो तर त्याचा विकास दर खूप जास्त आहे. सध्या भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की, आगामी काळात देशाला जगातील नंबर 1 वाहन निर्मिती केंद्र (Nitin Gadkari On Auto Sector) बनवण्याचे आमचे ध्येय आहे.
गडकरी म्हणाले की, त्यांना वाहन उद्योग 25 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याची इच्छा आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमधील सेमिनारला संबोधित करताना गडकरींनी ऑटोमोबाईल उत्पादकांना स्वच्छ तंत्रज्ञान, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. असे केले नाही तर आपण मागे राहू, असे गडकरी म्हणाले.
हेही वाचा – जगातील पहिली हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक बाईक! ट्रान्सपरन्ट लूक आणि 150 किमीची रेंज
गडकरी म्हणाले, ”देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि स्वावलंबी बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाखाली आम्हाला वाहन क्षेत्राला 25 लाख कोटी रुपयांचा उद्योग बनवायचा आहे. आपल्याला नंबर वन व्हायचे आहे. आमचे ध्येय, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला जगातील प्रथम क्रमांकाचे उत्पादन केंद्र बनवणे आहे.”
”मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र जगात सातव्या क्रमांकावर होते. आता आपण जपानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. ऑटोमोबाईल क्षेत्रात भरपूर क्षमता आहे आणि ती केवळ देशांतर्गत बाजारपेठेपर्यंतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विस्तारली आहे”, असे गडकरींनी सांगितले.
सध्या भारतातील ऑटोमोबाईल उद्योग 12.5 लाख कोटी रुपयांचा आहे. गडकरी म्हणाले, “या उद्योगामुळे देशात चार कोटी रोजगार निर्माण झाले आहेत. हा उद्योग राज्य आणि केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) स्वरूपात सर्वाधिक महसूल देतो. गेल्या काही वर्षांत भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) विक्री अनेक पटींनी वाढली आहे.”