₹60 हजार भाड्याने कार आणि थेट…, मुंबईत इव्हेंट मॅनेजरचा धक्कादायक कार घोटाळा उघड!

WhatsApp Group

Mumbai Car Scam : लक्झरी कार भाड्याने घेऊन थेट बँकेत गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मालवणी पोलिसांनी एका इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली असून, त्याने अनेक कारमालकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.

मालवणी परिसरातील एका रहिवाशाकडून आरोपीने टोयोटा फॉर्च्युनर कार महिन्याला ₹60 हजार भाड्याने घेतली होती. सुरुवातीचे काही महिने नियमित भाडे देऊन विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीने त्या वाहनातील GPS ट्रॅकर काढून टाकला आणि संबंधित कार फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून मोठी रक्कम उचलली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संपर्क तुटताच उघडकीस आला घोटाळा

काही महिन्यांनंतर आरोपीने अचानक कारमालकाचा फोन उचलणे बंद केले. संशय बळावल्याने कारमालकाने थेट मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान हा प्रकार केवळ एका कारपुरता मर्यादित नसून, अनेक लक्झरी वाहनांचा वापर करून मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – फॅमिली कार खरेदी करणार असाल तर थांबा! Nissan ची ‘नवीन’ MPV येतेय!

कोण आहे आरोपी?

पोलिसांनी आशिष किसन जाधव (वय 36–37) या आरोपीला अटक केली आहे. तो ठाणे येथील रहिवासी असून इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने याच पद्धतीने वेगवेगळ्या कारमालकांकडून महागड्या गाड्या भाड्याने घेऊन त्या बँक आणि फायनान्स कंपन्यांकडे गहाण ठेवल्याचा आरोप आहे.

ऊसाच्या शेतात लपवलेल्या लक्झरी कार

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एकूण 8 लक्झरी कार जप्त केल्या आहेत. या कार सांगली आणि कराड शहर पोलीस हद्दीतील ऊसाच्या शेतांमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ₹1.01 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून आता आणखी कारमालकांची फसवणूक झाली आहे का, तसेच या घोटाळ्यात इतर कोणी साथीदार आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे कार भाड्याने देताना काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment