Car Insurance : तुम्ही नवीन गाडी घेतली आहे आणि तिचं इन्शुरन्सही काढलं आहे. त्यामुळे तुम्ही निवांत असता, काही होवो, विमा कंपनी सगळं नुकसान भरून देईल! पण खरी गोष्ट थोडी वेगळी आहे. कारण बहुतांश केसमध्ये तुम्हाला पूर्ण रक्कम मिळत नाही. विमा कंपनी फक्त डेप्रिसिएटेड व्हॅल्यू म्हणजे कमी झालेल्या बाजारमूल्यानुसारच क्लेम देते.
पण जर अशी एक पॉलिसी असेल जी तुमच्या गाडीची किंमत कमी होऊ देत नाही, आणि चोरी किंवा टोटल डॅमेज झाल्यास पूर्ण ऑन-रोड किंमत परत मिळवून देते. होय, अशा पॉलिसीचं नाव आहे RTI म्हणजेच Return To Invoice Insurance.
RTI म्हणजे नेमकं काय?
‘रिटर्न टू इनव्हॉइस’ (Return to Invoice) हा एक अॅड-ऑन कव्हर आहे, जो तुम्ही तुमच्या कंप्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स सोबत घेऊ शकता.
याचा फायदा तेव्हा मिळतो जेव्हा—
- तुमची गाडी चोरी जाते, किंवा
- गाडी इतकी डॅमेज होते की दुरुस्ती करणे शक्यच राहत नाही.
अशा वेळी विमा कंपनी तुम्हाला गाडीची पूर्ण ऑन-रोड किंमत देते — म्हणजेच एक्स-शोरूम प्राइस, रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन चार्जेससह संपूर्ण रक्कम.
उदाहरणार्थ तुम्ही 10 लाख रुपयांची गाडी घेतली, आणि कर, रजिस्ट्रेशन धरून एकूण खर्च झाला 11 लाख. दोन वर्षांनी गाडी चोरी झाली. जर RTI पॉलिसी घेतली असेल, तर तुम्हाला पूर्ण ₹11 लाखांचा क्लेम मिळू शकतो.
हेही वाचा – आरारारा खतरनाक..! टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला टाटा मोटर्सकडून सरप्राईज गिफ्ट!
RTI पॉलिसीचा खर्च आणि वैधता
सामान्य इन्शुरन्सपेक्षा RTI थोडं महाग असतं. साधारण 10% अधिक प्रीमियम भरावा लागतो. बहुतांश कंपन्या ही पॉलिसी फक्त नवीन गाड्यांसाठी देतात, तर काही कंपन्या 2-3 वर्षे जुन्या गाड्यांनाही कव्हर करतात.
ही पॉलिसी वर्षभरासाठीच वैध असते आणि दरवर्षी रिन्यू करावी लागते. त्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये एक्सपायरी आणि रिन्यूअल डेट नेहमी तपासावी.
RTI आणि IDV मध्ये फरक काय?
गाडी शोरूममधून बाहेर पडताच तिचं मूल्य कमी व्हायला सुरुवात होतं — यालाच म्हणतात IDV (Insured Declared Value) म्हणजे बाजारातील वर्तमान किंमत.
वेळ जसजसा जातो, गाडीचं मूल्य घटतं (डेप्रिसिएशन).
| गाडीचे वय | डेप्रिसिएशन दर |
| 6 महिनेपर्यंत | 5% |
| 6 महिने – 1 वर्ष | 15% |
| 1 – 2 वर्षे | 20% |
| 2 – 3 वर्षे | 30% |
| 3 – 4 वर्षे | 40% |
| 4 – 5 वर्षे | 50% |
जर RTI घेतलं नसेल, तर क्लेम डेप्रिसिएटेड व्हॅल्यू वर मिळतो. पण RTI घेतल्यास तुम्हाला पूर्ण ऑन-रोड किंमत परत मिळते.
RTI कुठे लागू होत नाही?
RTI जादू नाही, यालाही काही मर्यादा आहेत —
- लहान नुकसान: फक्त छोटा डेंट किंवा काच फुटल्यास RTI लागू होत नाही.
- थर्ड पार्टी पॉलिसी: RTI फक्त कंप्रीहेन्सिव्ह इन्शुरन्स मध्येच मिळते.
- जुनी गाडी: पाच वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांसाठी सामान्यतः RTI उपलब्ध नसते.
कोणी RTI घ्यावी?
जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही परिस्थितीत असाल, तर RTI तुमच्यासाठी उत्तम ठरेल —
- नुकतीच नवीन गाडी घेतली आहे,
- पूर, वादळ किंवा नैसर्गिक आपत्तीप्रवण भागात राहता,
- तुमच्या भागात वाहन चोरीची प्रकरणे वारंवार होतात.