Car Mileage Truth : कार खरेदी करताना सर्वात पहिला प्रश्न असतो, “ही कार किती मायलेज देते?” कारण कार खरेदीचा मोठा खर्च एकवेळ असतो, पण रोजचा पेट्रोल-डिझेल खर्च हा खिशाला खरा फटका देतो. त्यामुळे कंपन्या ज्या मायलेजचा दावा करतात, तो वापरकर्त्यांना प्रत्यक्षात मिळतच नाही. मग प्रश्न निर्माण होतो की कार कंपन्या खोटं बोलतात का? याचं उत्तर आहे—नाही! पण परिस्थिती वेगळी असते.
ARAI मायलेज म्हणजे काय?
कारचं मायलेज ARAI (Automotive Research Association of India) ही भारत सरकारची सहकारी संस्था ठरवते. ही संस्था प्रत्येक गाडीचा होमोलोगेशन टेस्ट घेते आणि त्यानंतर ARAI रेटेड मायलेज जाहीर करते.
पण या टेस्ट आदर्श आणि नियंत्रित परिस्थितीत केल्या जातात. म्हणूनच लॅबोरेटरीमध्ये मिळालेलं मायलेज आणि रस्त्यावर मिळणारं मायलेज एकसारखं नसतं.
ARAI मायलेज प्रत्यक्ष जीवनात का जुळत नाही?
1) रस्त्यांची वास्तविक परिस्थिती वेगळी
ARAI टेस्टमध्ये कार 19 मिनिटे सलग चालवली जाते, ब्रेकिंग नाही, ट्रॅफिक नाही, खड्डे नाहीत.
पण वास्तवात?
- ट्रॅफिक
- सिग्नलवर थांबणं
- खराब रस्ते
- सतत ब्रेक/अॅक्सिलरेट
हे सगळं मायलेज कमी करतं.
2) एसी बंद ठेवून टेस्ट केली जाते
टेस्टमध्ये AC चालू नसतो, पण वापरकर्ते AC शिवाय कार चालवतच नाहीत.
AC चालू असेल की इंजिनवर लोड वाढतो आणि मायलेज घटतो.
3) ड्रायव्हिंग स्टाइलचा मोठा प्रभाव
ARAI टेस्टमध्ये कार:
- 31 किमी/तास सरासरी वेगाने,
- संगणकाद्वारे नियंत्रित पद्धतीने चालते,
- क्लच/थ्रॉटल/ब्रेकचा मानवी वापर नाही.
पण प्रत्यक्षात प्रत्येकाची ड्रायव्हिंग पद्धत वेगळी:
- कोणी वेगात चालवतो
- कोणी वारंवार ब्रेक लावतो
- कोणी जड पायाने अॅक्सिलरेट करतो
यामुळे मायलेज बदलतं.
ARAI मायलेज VS रिअल मायलेज – प्रत्यक्ष चाचणीचे परिणाम
| कार | ARAI रेटेड मायलेज | शहर (Real) | हायवे (Real) |
| Toyota Hyryder Hybrid | 27.97 kmpl | 18.02 kmpl | 23.77 kmpl |
| Hyundai Aura | 20.5 kmpl | 14.03 kmpl | 18.21 kmpl |
| Hyundai Verna | 20.6 kmpl | 9.60 kmpl | 18.28 kmpl |
ही तुलना स्पष्ट दाखवते की ARAI मायलेजपेक्षा रिअल मायलेज नेहमी कमीच असते.
मग तुम्हाला मिळणारं मायलेज कसं ठरवतं?
- तुमची ड्रायव्हिंग स्टाइल
- रस्त्यांची अवस्था
- AC वापर
- टायर प्रेशर
- कारचा लोड
- पेट्रोल/डिझेलची गुणवत्ता
म्हणूनच ARAI दिलेला आकडा हा आदर्श परिस्थितीसाठी असतो, प्रत्यक्ष रस्त्यासाठी नाही.