
Apple Self-Driving Car Project | तंत्रज्ञान जगभर विस्तारत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातही तंत्रज्ञान प्रगत होत आहे. अनेक कंपन्या चालकरहित गाड्यांवर काम करत आहेत. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेली अॅप्पलही ड्रायव्हर-लेस कार किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कारवर काम करत होती. पण, ताज्या रिपोर्ट्सनुसार, अॅप्पलने आपला सेल्फ-ड्रायव्हिंग कार प्रोजेक्ट बंद केला आहे.
यानंतर या प्रोजेक्टमधील ‘शेकडो कर्मचाऱ्यांना’ कामावरून काढले जाण्याची शक्यता आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार, कंपनी शक्यतो “टीममधील शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे आणि प्रकल्पावरील सर्व काम थांबले आहे.” अॅप्पल कार प्रकल्पात अंदाजे 1,400 कर्मचारी होते. या सर्वांना कदाचित काढून टाकले जाणार नसले तरी, यापैकी काही कर्मचाऱ्यांना अॅप्पलच्या जनरेटिव्ह एआय (GenAI) प्रकल्पांमध्ये स्थलांतरित केले जाईल.
अॅप्पलने 2014 मध्ये पहिल्यांदा “प्रोजेक्ट टायटन” नावाच्या कार प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. 2021 मध्ये BMW चे माजी कार्यकारी Ulrich Kranz यांची नियुक्ती केली, ज्यांनी i3 प्रोग्राम चालवण्यास मदत केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, अॅप्पलने त्यांचे इलेक्ट्रिक वाहन लाँच करणे 2026 पर्यंत पुढे ढकलले होते, ज्याची किंमत $1 लाखांपेक्षा कमी असणे अपेक्षित होते.
हेही वाचा – भारतात धुमाकूळ होणार..! विनफास्टने ‘या’ इलेक्ट्रिक गाडीसाठी रजिस्टर केलं पेटंट
आधीच्या अहवालानुसार, आयफोन निर्माता अॅप्पलने सुरुवातीला स्टीयरिंग व्हील किंवा पेडल्सशिवाय कार तयार करण्याचा हेतू ठेवला होता, जेणेकरून प्रवासी एकमेकांना तोंड देत बसू शकतील. तथापि, नंतर प्रकल्पाची व्याप्ती कमी करण्यात आली आणि ड्रायव्हरची सीट, स्टीयरिंग व्हील आणि पेडल्ससह अधिक पारंपारिक डिझाइन तयार केले गेले. आता हा प्रकल्प बंद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.