
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची (Maruti Suzuki’s EV Plant In Gujarat) घोषणा केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे सुरू असलेल्या 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) दरम्यान, मारुती सुझुकी इंडियाने गुजरातमध्ये आपला दुसरा प्लांट स्थापन करण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे, कंपनीचे 2030-31 पर्यंत वार्षिक उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. क्षमता 40 लाखांपेक्षा जास्त युनिटपर्यंत वाढवायची आहे.
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) मध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (SMC) चे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी राज्यात दोन मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले, ”प्लांटची उत्पादन क्षमता वर्षाला 10 लाख युनिट्स असेल. गुजरातमध्ये दुसरा कार प्लांट तयार करण्यासाठी आम्ही 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत, जे दरवर्षी 10 लाख युनिट्सचे उत्पादन करेल.”
नवीन प्लांटचे ऑपरेशन 2028-29 या आर्थिक वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने अद्याप प्लांटचे स्थान किंवा येथे कोणते मॉडेल तयार केले जातील याबद्दल कोणतीही माहिती सामायिक केलेली नाही. याबाबत वेळ आल्यावर माहिती दिली जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. हा नवीन प्लांट सुरू झाल्यानंतर, गुजरातमध्ये वार्षिक उत्पादन क्षमता 2 मिलियन (20 लाख) युनिट्स होईल.
गुजरातमध्ये बनणार पहिली इलेक्ट्रिक कार
सुझुकी यांनी सांगितले, “सुझुकी ग्रुपचे पहिले बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV) सुझुकी मोटर गुजरातमधून या वर्षाच्या अखेरीस बाजारात आणले जाईल. आम्ही ही इलेक्ट्रिक कार केवळ भारतातच सादर करणार नाही, तर ती इतर देशांमध्येही निर्यात केली जाईल. भविष्यात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी, सुझुकी ग्रुप सुझुकी मोटर गुजरातमध्ये नवीन चौथी उत्पादन लाइन जोडण्यासाठी 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, जी दरवर्षी 2.5 लाख युनिट्सचे उत्पादन करेल. यासह, वार्षिक उत्पादन सुझुकी मोटर गुजरातची क्षमता सध्याच्या 7.5 लाखांवरून 10 लाख युनिटपर्यंत वाढेल.”
हेही वाचा – यामाहाने आणली 2024 ची नवीन बाईक, करिझ्मा आणि पल्सरला देणार टक्कर!
मारुती सुझुकीने मागच्या वर्षी ऑटो एक्सपो दरम्यान आपली पहिली इलेक्ट्रिक कार मारुती सुझुकी eVX शोकेस केली होती. त्यावेळी कंपनीने आपल्या कॉन्सेप्ट मॉडेलचे अनावरण केले होते. आता कंपनी या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी मोठी तयारी करत आहे. बहुधा ही कार एका चार्जमध्ये 550 किमीची रेंज देईल.
2026-27 या आर्थिक वर्षात चौथी उत्पादन लाइन सुरू केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. आगामी काळात पारंपरिक पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या कार्स व्यतिरिक्त, मारुती सुझुकी CNG, बायोगॅस, बायोइथेनॉल, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इत्यादी पर्यायी ऊर्जा स्रोतांवर चालणाऱ्या कार्सवरही भर देणार आहे.