
Tata’s Biggest EV Battery Factory In Britain | टाटा समूहाचाही झपाट्याने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक कार व्यवसायावर भर आहे. याअंतर्गत टाटा समूह बॅटरी बनवण्यासाठी नवीन गिगाफॅक्टरी उभारणार आहे. टाटा समूहाची बॅटरी गिगाफॅक्टरी ब्रिजवॉटर, ब्रिटनमध्ये बांधली जाणार आहे.
टाटा समूहाने सांगितले, की त्यांचा बहु-अब्ज डॉलरचा बॅटरी प्लांट ब्रिजवॉटर, दक्षिण पश्चिम इंग्लंडमध्ये बांधला जाईल. भारताबाहेर टाटा समूहाची ही पहिली गिगाफॅक्टरी असेल. टाटा समूह या गिगाफॅक्टरीमध्ये 5 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे जी सॉमरसेट काऊंटीमध्ये बांधली जात आहे. या गिगाफॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅटरी तयार केल्या जातील, ज्या ईव्हीसह ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करतील.
युरोपमधील सर्वात मोठा बॅटरी प्लांट
अग्रातास (Agratas) टाटा समूहाचा जागतिक बॅटरी व्यवसाय चालवते. त्यांनी बुधवारी त्यांच्या प्रस्तावित ब्रिटिश बॅटरी प्लांटची माहिती दिली. कंपनीने सांगितले की, प्रस्तावित प्लांटची क्षमता 40 GWh असेल. हा प्लांट ब्रिजवॉटरच्या ग्रॅव्हिटी स्मार्ट कॅम्पसमध्ये तयार केला जाणार आहे. टाटा समूहाने गेल्या वर्षी जुलैमध्ये या प्लांटची घोषणा केली होती. हा केवळ ब्रिटनमधीलच नव्हे तर संपूर्ण युरोपमधील सर्वात मोठा बॅटरी-सेल निर्मिती प्रकल्प असेल.
हजारो लोकांना रोजगार
अग्रतास यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्याचा प्रस्तावित बॅटरी प्लांट 4000 लोकांना रोजगार देणार आहे. या प्रकल्पातून हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने हा प्लांट बांधण्यात येणार आहे. 2026 मध्ये प्लांटमध्ये बॅटरीचे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जग्वार लँड रोव्हर आणि टाटा मोटर्स हे तिचे प्रारंभिक ग्राहक असतील.
हेही वाचा – नवीन 2024 Bajaj Pulsar NS125 लाँच, किंमत आधीपेक्षा जास्त!
टाटा मोटर्स ही भारतातील तिसरी सर्वात मोठी प्रवासी कार कंपनी आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत, टाटा मोटर्सने अलीकडेच मारुती सुझुकीला मागे टाकले आहे आणि ती भारतातील सर्वात मौल्यवान कार कंपनी बनली आहे. विक्रीच्या दृष्टीने दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकासाठी Hyundai India आणि Tata Motors यांच्यात स्पर्धा आहे. ब्रिटनचा आयकॉनिक लक्झरी ब्रँड जग्वार लँड रोव्हर देखील टाटा समूहाचा एक भाग आहे, जो काही काळापूर्वी टाटा समूहाने विकत घेतला होता.