Fastag Annual Pass : रस्त्याने प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेला फास्टॅग वार्षिक पास (Fastag Annual Pass) योजना अखेर 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे. हा प्रीपेड टोल पेमेंट पास खासगी कार, जीप आणि व्हॅनसाठी उपलब्ध होणार असून, यामुळे टोल भरण्याचा सरासरी खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
फास्टॅग वार्षिक पासमध्ये काय मिळणार?
- वार्षिक पासची किंमत: ₹3000
- वैधता: 1 वर्ष किंवा 200 ट्रिप्स (जे आधी संपेल)
- टोल खर्च: सरासरी टोल चार्ज ₹50 वरून फक्त ₹15 वर येणार
- उपलब्धता: फक्त केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग (NHAI) आणि एक्सप्रेस-वेवर
- मर्यादा: राज्य सरकारच्या एक्सप्रेस-वेवर लागू नाही (उदा. यमुना, आग्रा-लखनौ, पूर्वांचल, बुंदेलखंड एक्सप्रेस-वे)
वार्षिक पास कसा खरेदी करायचा?
- Google Play Store किंवा Apple App Store वरून Rajmargyatra App डाउनलोड करा.
- ॲपमध्ये Fastag Pass खरेदी किंवा रिन्यू करण्याचा पर्याय निवडा.
- आवश्यक माहिती भरून ₹3000 चा पेमेंट करा.
- नवीन फास्टॅग घेण्याची गरज नाही; हा पास विद्यमान फास्टॅगवरही सक्रिय करता येईल.
एकाच पासचा वापर दोन गाड्यांसाठी करता येईल का?
नाही! फास्टॅग पास फक्त त्या वाहनासाठी लागू असेल ज्याचा रजिस्ट्रेशन नंबर त्याच्याशी लिंक आहे. दुसऱ्या वाहनावर वापरल्यास पास ब्लॉक होऊ शकतो. तसेच, फास्टॅग वाहनाच्या विंडशील्डवर योग्य प्रकारे लावणे बंधनकारक आहे.
200 ट्रिप्सची मोजणी कशी होईल?
- टोल क्रॉस करणे = 1 ट्रिप
- राउंड ट्रिप = 2 ट्रिप
- जर टोल बंद असेल तर जाणे-येणे मिळून 1 ट्रिप धरली जाईल.
- 200 ट्रिप्स पूर्ण झाल्यावर किंवा वर्ष संपल्यावर पास रिन्यू करावा लागेल.
हा पास कोणासाठी फायदेशीर?
- जे प्रवासी वर्षभरात 2500 ते 3000 किमी टोल रोडवर प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा पास अत्यंत फायदेशीर ठरणार.
- टोलवरील गर्दी कमी होईल, वेळ वाचेल आणि पैशांची मोठी बचत होईल.
- टोल चार्जवरून होणारे वाद कमी होतील.
जर तुम्ही नियमितपणे NHAI च्या रस्त्यांवरून प्रवास करत असाल, तर 15 ऑगस्टपासून लागू होणारा फास्टॅग वार्षिक पास तुमच्यासाठी वर्षभराची जबरदस्त बचतीची संधी आहे. फक्त एकदा रिचार्ज करा आणि 200 ट्रिप्सपर्यंत टोलच्या त्रासातून सुटका मिळवा!