VIDEO : 40 लाखांच्या गाडीची वाट लागली! प्रसिद्ध युट्युबरचा गडकरींवर संताप, म्हणाला, ‘‘देश उद्ध्वस्त केलाय…’’

WhatsApp Group

E20 Petrol Fuel Damage Controversy India : देशभरात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात घटवण्यासाठी केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रित इंधनाचा (E20 Petrol) वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, या ई२० पेट्रोलच्या गुणवत्तेवरून आता देशभरातील वाहनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांचे मायलेज घटणे, कार्यक्षमता मंदावणे आणि इंजिनचे अंतर्गत भाग खराब होणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. यातच आता बिहारमधील प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यप याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणांवर थेट निशाणा साधला आहे. आपल्या अवघ्या दोन महिने जुन्या आणि ४० लाख रुपये किमतीच्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova Hycross) या कारचे इंजिन ई२० पेट्रोलमधील अशुद्धतेमुळे खराब झाल्याचा आरोप त्याने केला आहे.

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर आणि वाहन उद्योगात पेट्रोलच्या गुणवत्तेविषयी एका नवीन आणि गंभीर वादाला तोंड फुटले आहे. कंपन्या गाड्या ई२० सुसंगत असल्याचे सांगत असल्या, तरी प्रत्यक्ष बाजारात मिळणारे इंधन वाहनांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.

अवघ्या १२,००० किलोमीटरमध्ये इंजिन बिघडलं

संबंधित युट्यूबरने दिलेल्या माहितीनुसार, त्याने दोन महिन्यांपूर्वीच ४० लाख रुपये खर्च करून टोयोटाची हायब्रिड एमपीव्ही (MPV) खरेदी केली होती. गाडीची पहिली १०,००० किलोमीटरची सर्व्हिसिंग वेळेवर झाली होती. मात्र, अवघे १२,००० किलोमीटर अंतर पूर्ण झाल्यानंतर गाडीच्या इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. जी गाडी सुरुवातीला प्रतिलीटर १७ ते २० किलोमीटरचे मायलेज देत होती, ती अचानक प्रतिलीटर अवघे ५ किलोमीटर मायलेज देऊ लागली.

सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणी केली असता, गाडीच्या इंधन टाकीतून काढलेल्या पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात इथेनॉल आणि मोठ्या प्रमाणावर कचरा (अशुद्धी) आढळून आल्याचा दावा मुख्य मेकॅनिकच्या हवाल्याने करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इंधनाच्या खराब गुणवत्तेमुळे झालेला हा बिघाड असल्याने वाहन उत्पादक कंपनीने हा खर्च वॉरंटी अंतर्गत कव्हर करण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे वाहनधारकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे.

पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉल आणि ‘फेज सेपरेशन’चा धोका

ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ई२० इंधनाचा वापर करण्यासाठी गाड्यांचे इंजिन तयार केलेले असले, तरी पेट्रोल पंपांवर मिळणाऱ्या इंधनाची साठवणूक आणि शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते. इथेनॉलमध्ये हवेतील आणि जमिनीखालील टाकीतील ओलावा (पाणी) शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. जर पेट्रोल पंपाच्या टाकीत किंवा वाहतुकीदरम्यान पाणी मिसळले, तर इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे होते. या प्रक्रियेला ‘फेज सेपरेशन’ म्हणतात.

हे पाणीमिश्रित आणि कचरा असलेले इंधन जेव्हा हायटेक इंजिनच्या फ्युएल इंजेक्शन सिस्टीममध्ये जाते, तेव्हा फ्युएल पंप आणि इंजिन ब्लॉकचे अतोनात नुकसान होते. ग्राहकांचा असा आरोप आहे की, अनेक पेट्रोल पंपांवर निर्धारित २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे, ज्याचा थेट फटका वाहनांच्या कार्यक्षमतेला बसत आहे.

शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी

या वाढत्या वादामुळे आता ग्राहकांकडून केंद्र सरकारकडे नवीन मागणी केली जात आहे. जर इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असेल, तर सरकारने ग्राहकांना जुन्या पद्धतीचे १०० टक्के शुद्ध पेट्रोल वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे, मग त्यासाठी प्रतिलीटर २० रुपये जास्त मोजावे लागले तरी चालतील.

सध्या ई२० पेट्रोलचा नियम देशभरात लागू करण्यात आला आहे, परंतु इंधनाची गुणवत्ता तपासणारी कोणतीही ठोस यंत्रणा सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. इंधनातील अशुद्धतेमुळे होणाऱ्या नुकसानीला पेट्रोलियम मंत्रालय, पेट्रोल पंप चालक की वाहन उत्पादक कंपन्या जबाबदार आहेत, याचा कोणताही स्पष्ट खुलासा नसल्याने ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आगामी काळात सरकारने इंधनाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवले नाही, तर वाहन बाजारात ग्राहकांचा विश्वास कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment