Electric Car Towing Mistake : हायवेवर किंवा लांबच्या प्रवासात अचानक गाडी बंद पडली, तर सर्वसाधारणपणे आपण काय करतो?
जवळचा मेकॅनिक शोधतो, रोड साइड असिस्टन्सला कॉल करतो किंवा शेवटचा पर्याय म्हणून गाडी टो करून जवळच्या गॅरेजपर्यंत नेण्याची व्यवस्था करतो.
पेट्रोल किंवा डिझेल कारसाठी हे सगळं ठीक असतं.
पण हीच चूक इलेक्ट्रिक कार (EV) बाबतीत केली, तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
होय, इलेक्ट्रिक कार बंद पडल्यावर तिला टो करणे अतिशय धोकादायक ठरू शकते आणि यामुळे तुमच्या खिशाला जोरदार झटका बसू शकतो.
टो केल्यास EV चं ‘टाटा’ होऊ शकतं!
इलेक्ट्रिक कारचं ड्राइव्हट्रेन सिस्टीम पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते.
EV मध्ये पारंपरिक अर्थाने ‘न्यूट्रल गियर’ नसतो.
जर इलेक्ट्रिक कारला ड्राइव्ह किंवा रिव्हर्स गियरमध्ये टो केलं, तर मोटरचा शाफ्ट फिरू लागतो.
यामुळे काइनेटिक एनर्जी तयार होते, जी सिस्टीम रीजेनरेटिव्ह ब्रेकिंगद्वारे बॅटरीमध्ये साठवण्याचा प्रयत्न करते.
पण —
- जर बॅटरी पूर्णपणे डेड असेल
- किंवा चार्ज स्वीकारण्याच्या स्थितीत नसेल
तर ही ऊर्जा कुठेही साठवली जात नाही.
यामुळे मोटर, इन्व्हर्टर आणि इतर महागडे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खराब होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.
एकदा हे घटक खराब झाले, तर दुरुस्तीचा खर्च हजारांत नाही, तर लाखांत जाऊ शकतो.
टो करायचीच वेळ आली तर काय करायचं?
काही वेळा टो करणं अपरिहार्य ठरू शकतं.
अशा वेळी लक्षात ठेवा —
फ्लॅटबेड टो ट्रकचाच वापर करा
कार ओढत नेऊ नका, तर ट्रकवर उचलून ठेवा
थेट चार्जिंग स्टेशन किंवा अधिकृत सर्विस सेंटरपर्यंत गाडी पोहोचवा
काही प्रीमियम इलेक्ट्रिक कारमध्ये (उदा. Tesla) Dedicated Towing Mode दिलेला असतो, पण तो वापरण्यापूर्वी मॅन्युअल किंवा कस्टमर केअरची खात्री घ्या.
थोडा धक्का देणं कधी चालतं?
जर —
- बॅटरी संपल्याचे संकेत मिळत असतील
- किंवा कार अचानक रस्त्याच्या मधोमध बंद पडली असेल
तर ट्रॅफिक अडवू नये म्हणून फक्त 50 मीटरपर्यंत कार ढकलता येते.
तेही —
- 5 किमी/तास पेक्षा कमी वेगाने
- फक्त रस्त्याच्या कडेला नेण्यासाठी
यापेक्षा जास्त ढकलणे किंवा चालवण्याचा प्रयत्न करू नका.
मग नेमकं करायचं काय?
जर —
- कार ढकलता येत नसेल
- टो करणं धोकादायक असेल
तर उत्तर एकच आहे थेट कंपनीच्या सर्विस सेंटरला किंवा रोड साइड असिस्टन्सला कॉल करा.
बहुतेक EV कंपन्या —
- पोर्टेबल चार्जर
- फ्लॅटबेड रिकव्हरी ट्रक
- किंवा ऑन-स्पॉट तपासणी सेवा
पुरवतात. ते तुमच्या लोकेशनवर येतील, समस्या तपासतील आणि सुरक्षित मार्गाने गाडी सर्विस सेंटरपर्यंत नेतील.
EV फक्त गाडी नाही, ती टेक्नॉलॉजी आहे!
इलेक्ट्रिक कार पेट्रोल-डिझेल गाड्यांसारखी साधी नसते. थोडीशी चुकीची हाताळणी देखील मोठ्या खर्चात बदलू शकते. म्हणून पुढच्या वेळी तुमची इलेक्ट्रिक कार मध्येच बंद पडली, तर स्वतःहून टो करू नका आणि जुनी पद्धत वापरू नका. कस्टमर केअर हाच सर्वात सुरक्षित आणि योग्य पर्याय आहे.
(टीप: पेट्रोल-डिझेल ऑटोमॅटिक कारलाही खराब झाल्यावर टो करणं धोकादायकच असतं. तिथेही फ्लॅटबेड ट्रकच योग्य!)