New Kia Seltos 2026 Mileage : भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक पसंती मिळवणाऱ्या मिड-साईज SUV पैकी एक असलेल्या किआ सेल्टोसच्या (Kia Seltos) चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जानेवारी २०२६ मध्ये लाँच झालेल्या न्यू जनरेशन किआ सेल्टोसचा अधिकृत मायलेज आता स्पष्ट झाला आहे. लाँचिंगच्या वेळी कंपनीने मायलेजबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केली नव्हती, मात्र आता एआरएआय (ARAI) रिपोर्टनुसार या कारच्या इंधन कार्यक्षमतेची सविस्तर माहिती समोर आली आहे.
डिझेल व्हेरियंट ठरले मायलेज किंग
नव्या किआ सेल्टोसच्या लाइनअपमध्ये डिझेल इंजिनचे व्हेरियंट सर्वात जास्त मायलेज देणारे ठरले आहेत. अधिकृत माहितीनुसार, सेल्टोसच्या १.५ लीटर डिझेल मॅन्युअल (HTE) व्हेरियंटमध्ये तब्बल १९.४ किमी प्रति लिटर (kmpl) इतका दमदार मायलेज मिळते. तर, डिझेल ऑटोमॅटिक (HTE (O)) व्हेरियंट १७.८ किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी आणि लांबच्या प्रवासासाठी हे दोन्ही व्हेरियंट अत्यंत किफायतशीर ठरणार आहेत.
पेट्रोल आणि टर्बो पेट्रोल इंजिनची कामगिरी
डिझेलनंतर टर्बो पेट्रोल व्हेरियंटची कामगिरीही कौतुकास्पद ठरली आहे. ७-स्पीड डीसीटी (DCT) गिअरबॉक्ससह येणारे टर्बो पेट्रोल (HTE (O)) व्हेरियंट १७.५ किमी प्रति लिटरचं मायलेज देते. विशेष म्हणजे, परफॉर्मन्सच्या बाबतीत हे इंजिन अधिक शक्तिशाली असूनही मायलेजच्या बाबतीत समाधानकारक आहे. दुसरीकडे, आयएमटी (iMT) गिअरबॉक्ससह येणारे टर्बो पेट्रोल व्हेरियंट सुमारे १५.६ किमी प्रति लिटरचं मायलेज देते, जे संपूर्ण लाइनअपमध्ये सर्वात कमी आहे.
हेही वाचा – Duster, Sierra आणि Seltos पैकी कोणती SUV आहे फॅमिलीसाठी सर्वात सुरक्षित?
नॉर्मल पेट्रोल इंजिनचा (Naturally Aspirated) विचार केल्यास, मॅन्युअल आणि आयव्हीटी (iVT) या दोन्ही प्रकारांमध्ये कार साधारण १६.५ किमी प्रति लिटरचा मायलेज देण्याचा दावा करते.
इंजिन आणि ट्रान्समिशनचे वैविध्यपूर्ण पर्याय
नवीन किआ सेल्टोसमध्ये ग्राहकांना तीन मुख्य इंजिन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत: १. १.५ लीटर पेट्रोल (११५ hp) २. १.५ लीटर टर्बो पेट्रोल (१६० hp) ३. १.५ लीटर डिझेल (११६ hp)
या इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल, सीव्हीटी (iVT), ६-स्पीड ऑटोमॅटिक आणि ७-स्पीड डीसीटी (DCT) असे ट्रान्समिशनचे विविध पर्याय दिले गेले आहेत, जे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडता येतील.
२०२७ मध्ये येणार सेल्टोस हायब्रीड
किआ इंडियाने आपल्या भविष्यकालीन योजनांविषयी मोठी घोषणा केली आहे. सेल्टोसचे हायब्रीड व्हर्जन २०२७ मध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच केले जाणार आहे. यामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिनचे इलेक्ट्रिफाइड (हायब्रीड) व्हर्जन वापरले जाण्याची शक्यता आहे. हे मॉडेल लाँच झाल्यानंतर मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर यांसारख्या हायब्रीड गाड्यांच्या मक्तेदारीला मोठे आव्हान निर्माण होणार आहे. तसेच, हुंडई क्रेटा आणि रेनॉल्ट डस्टरच्या आगामी हायब्रीड मॉडेल्सशीही सेल्टोसची थेट स्पर्धा पाहायला मिळेल.
नव्या सेल्टोसचा हा दमदार मायलेज आणि आगामी हायब्रीड तंत्रज्ञान पाहता, किआ मोटर्सने पुन्हा एकदा भारतीय SUV मार्केटमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी पावले उचलल्याचे दिसून येत आहे. मात्र, ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की एआरएआयने दिलेले मायलेजचे आकडे हे आदर्श परिस्थितीत घेतलेल्या चाचणीवर आधारित असतात; प्रत्यक्ष रस्त्यावरील परिस्थिती, ट्रॅफिक आणि चालवण्याची पद्धत यानुसार प्रत्यक्ष मायलेजमध्ये बदल होऊ शकतो.