Electric Vehicles India 2026 : भारतामध्ये कार खरेदी करण्याच्या मानसिकतेत आता वेगाने बदल होताना दिसत आहे. पारंपारिक पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या तुलनेत आता ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) मोठ्या प्रमाणात वळत आहेत. या बदलामागे केवळ पर्यावरण प्रेम नसून, इराण आणि पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती हे एक प्रमुख कारण ठरले आहे. या युद्धामुळे इंधनाची उपलब्धता आणि त्यांच्या वाढत्या किमतींबाबत सर्वसामान्यांमध्ये चिंता वाढली असून, ऑटो क्षेत्रात ‘इलेक्ट्रिक क्रांती’ वेगाने पुढे सरकत आहे.
विक्रीत मोठी झेप: मार्च २०२६ ची आकडेवारी काय सांगते?
वाहन पोर्टलच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ मध्ये एकूण कार विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा ५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा वाटा केवळ ३.५ टक्के इतका होता. अवघ्या एका महिन्यात झालेली ही वाढ हे दर्शवते की, जागतिक संकटाचा भारतीय ग्राहकांच्या खरेदी निर्णयावर थेट परिणाम झाला आहे. जरी सध्या भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्या, तरी भविष्यातील संभाव्य दरवाढीच्या भीतीने लोक इलेक्ट्रिक पर्यायाला पसंती देत आहेत.
ईव्ही मार्केटमधील दिग्गज कंपन्यांची कामगिरी
मार्च २०२६ च्या विक्री अहवालानुसार, टाटा मोटर्सने (Tata Motors) इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
- टाटा मोटर्स: ८,२५३ युनिट्सची विक्री करत ३७ टक्के बाजारपेठेवर कब्जा मिळवला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत त्यांच्या विक्रीत ३८.८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
- महिंद्रा अँड महिंद्रा: ५,२४४ युनिट्सच्या विक्रीसह महिंद्राने ६५.२ टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली असून २३.५ टक्के बाजारपेठ काबीज केली आहे.
- JSW MG Motor India: ५,१४१ युनिट्सची विक्री करत २३ टक्के वाटा मिळवला आहे. विशेष म्हणजे, त्यांची ‘MG Windsor EV’ ही ४,५३० युनिट्ससह सर्वाधिक विकली जाणारी सिंगल इलेक्ट्रिक कार ठरली आहे.
- इतर कंपन्या: मारुती सुझुकीने ९४९ युनिट्स विकून ३२५.६ टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवली आहे, तर व्हिनफास्ट ऑटो इंडियाने ६९१ युनिट्सची विक्री केली आहे.
मागणी वाढण्यामागची जागतिक कारणे
ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील तणावामुळे ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ सारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर परिणाम झाला आहे. जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल याच मार्गावरून वाहून नेले जाते. या भागात संघर्ष सुरू झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फटका दीर्घकाळ बसू शकतो, हे ओळखून भारतीय ग्राहक आता ‘स्वदेशी’ वीजेवर चालणाऱ्या गाड्यांकडे वळत आहेत.
खिशाला परवडणारे गणित: लो रनिंग कॉस्ट
इलेक्ट्रिक कारची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिचा दैनंदिन धावण्याचा खर्च. सामान्य पेट्रोल कार १ किलोमीटर चालवण्यासाठी ७ ते ९ रुपये खर्च येतो (हे कारच्या मायलेजवर अवलंबून असते). याउलट, घरी चार्ज केलेली इलेक्ट्रिक कार या खर्चाच्या निम्म्याहून कमी खर्चात प्रवास पूर्ण करते. जे लोक महिन्यातून १,००० ते १,५०० किलोमीटर प्रवास करतात, त्यांच्यासाठी ईव्ही ही एक मोठी बचत ठरीत आहे. बॅटरीच्या कमी होणाऱ्या किमती आणि बॅटरी-एज-अ-सर्व्हिस (BaaS) सारख्या योजनांमुळे ईव्ही खरेदी करणे आता अधिक सुलभ झाले आहे.