Bharat Taxi : देशभरात ओला आणि उबरच्या टॅक्सी सेवांवर नाराजीचं वातावरण आहे. प्रवाशांचा त्रास, वाढलेली भाडं आणि काही वेळा ड्रायव्हर्सच्या उर्मट वर्तनामुळे अनेकांनी या सेवा वापरणं कमी केलं आहे. पण आता या सगळ्याला एक भारतीय पर्याय मिळणार आहे. ‘भारत टॅक्सी’ नावाची देशातील पहिली राष्ट्रीय सहकारी टॅक्सी सेवा (Cooperative Taxi Service) लाँच होणार आहे आणि ती बदल घडवणारी ठरणार आहे.
‘भारत टॅक्सी’ म्हणजे नेमकं काय?
ही एक सरकारी मान्यताप्राप्त कॅब सेवा आहे, जी सहकार मंत्रालय (Ministry of Cooperation) आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभी राहिली आहे.
या प्लॅटफॉर्मवर ड्रायव्हर हा केवळ चालकच नसून तो मालकही असेल. म्हणजेच, जे लोक गाडी चालवतात ते स्वतःच या कंपनीचे सदस्य असतील आणि त्यांना त्यांचा नफा थेट मिळेल.
यासाठी ‘सहकार टॅक्सी कोऑपरेटिव लिमिटेड’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. ही संस्था अमूल मॉडेलप्रमाणे काम करेल – म्हणजे सदस्यांनी एकत्र येऊन सेवा चालवायची आणि नफा वाटून घ्यायचा.
जून महिन्यात या उपक्रमाला तब्बल ₹300 कोटींचा निधी मिळाला असून, अमूलचे एमडी जयेन मेहता हे या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर एनसीडीसीचे उपव्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता हे उपाध्यक्ष आहेत.
कधी आणि कुठे सुरू होणार?
‘भारत टॅक्सी’चा मोबाईल अॅप नोव्हेंबर 2025 पासून डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
सुरुवातीला हे अॅप हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी या चार भाषांमध्ये असेल.
सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार
- डिसेंबर 2025 ते मार्च 2026: राजकोट, मुंबई, पुणे
- एप्रिल 2026 ते डिसेंबर 2026: लखनऊ, भोपाल, जयपूर
- 2027-28: देशातील आणखी 20 मोठी शहरे
- 2028-2030: सर्व जिल्हा मुख्यालये आणि ग्रामीण भागांपर्यंत विस्तार
भाडं आणि प्राइसिंग मॉडेल
‘भारत टॅक्सी’मध्ये ओला-उबरसारखी “डायनॅमिक प्राइसिंग”, “पीक अवर चार्ज”, “रेन सर्ज”, “कोल्ड सर्ज” अशा गोंधळात टाकणाऱ्या प्रणालींपासून प्रवाशांना सुटका मिळेल.
येथील भाडं निश्चित, वाजवी आणि पारदर्शक असेल.
सेफ्टी फीचर्स
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या अॅपमध्ये पोलिस स्टेशन इंटीग्रेशन आणि डिस्ट्रेस बटन सुविधा असेल. आपत्कालीन परिस्थितीत लाल बटण दाबल्यास नजीकच्या पोलिस ठाण्याला त्वरित माहिती मिळेल.
महिला चालकांना मोठी संधी
या उपक्रमात महिला चालकांनाही समान संधी दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 महिला चालकांना (सारथींना) जोडण्यात येईल, आणि 2030 पर्यंत ही संख्या 15,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
ड्रायव्हर्सना 100% कमाई
ड्रायव्हर्सना प्रत्येक राईडमधील पूर्ण उत्पन्न स्वतःकडे ठेवता येईल. त्यांना केवळ दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक सदस्यता शुल्क द्यावे लागेल – म्हणजेच कोणतीही कमिशन कपात नाही.