Renault Duster 2026 : रेनॉल्ट इंडियाने अखेर आपल्या सर्वाधिक लोकप्रिय SUV ‘डस्टर’च्या कमबॅकची अधिकृत घोषणा केली आहे. 4 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नवी जनरेशन डस्टर भारतात 26 जानेवारी 2026, म्हणजेच गणतंत्र दिनी धडकणार आहे. ही घोषणा कंपनीने नुकताच जारी केलेल्या अधिकृत टीझर व्हिडिओत केली असून, त्यामुळे SUV चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
2012 मध्ये पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेत दाखल झालेली डस्टर त्या काळात “मिड-साइज SUV” सेगमेंटमध्ये क्रांती घडवणारी गाडी ठरली होती. मात्र 2022 मध्ये तिचे उत्पादन थांबवण्यात आले होते. आता चार वर्षांनी ही SUV पूर्णपणे नवा अवतार घेऊन येत आहे.
नव्या डस्टरचे प्लॅटफॉर्म आणि डिझाइन
ही डस्टर रेनॉची सिस्टर कंपनी Dacia अंतर्गत सादर झालेल्या थर्ड-जनरेशन (2023) मॉडेलवर आधारित आहे. भारतात सेकंड जनरेशन मॉडेल कधीच आले नाही, त्यामुळे ही डस्टर भारतीय ग्राहकांसाठी मोठी अपग्रेड ठरणार आहे.
ही SUV रेनॉल्ट-निसानच्या CMF-B मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हा प्लॅटफॉर्म सध्या अनेक जागतिक मॉडेल्समध्ये वापरला जातो. त्यामुळे गाडी अधिक मजबुत, सुरक्षित आणि आधुनिक असेल.
डिझाइनमध्ये भारतीय ट्विस्ट
टीझरमध्ये संपूर्ण डिझाइन उघड झाले नसले, तरी काही बदल स्पष्ट दिसत आहेत. नवीन ग्रिल, अधिक आकर्षक बंपर डिझाइन, आणि भारतीय आवडीला साजेशे काही कॉस्मेटिक अपडेट्स पाहायला मिळतील.
डस्टरचा रग्ड आणि मस्क्युलर लुक कायम ठेवण्यात येईल. ग्लोबल मॉडेलप्रमाणे Y-शेप LED लाइट्स, फ्लेयर्ड व्हील आर्चेस आणि बॉडी क्लॅडिंग हे घटक भारतीय मॉडेलमध्येही असण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय मॉडेलप्रमाणे या SUV मध्ये लाइट आणि डार्क ग्रे शेडमध्ये टू-टोन डॅशबोर्ड, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि 10.1-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम दिले जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय क्रूझ कंट्रोल, मीडिया आणि कॉल बटणांसह तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील, तसेच सॉफ्ट-टच सरफेस आणि लाइट कलर्स असलेले इंटिरियर देऊन रेनॉ भारतासाठी खास व्हर्जन तयार करत आहे.
rising from the dust. ready to make a splash once again. the icon returns, bold as ever. #RenaultDuster #comingsoon pic.twitter.com/UccVSq6VdK
— Renault India (@RenaultIndia) October 28, 2025
इंजिन आणि व्हेरिएंट्स
अजून अधिकृतपणे इंजिनबाबत माहिती समोर आलेली नसली तरी तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही SUV Nissan Tekton प्रमाणेच CMF-B आर्किटेक्चरवर तयार केली जाईल.
रेनॉल्ट आणि निसान दोन्ही कंपन्या या प्लॅटफॉर्मवर आधारित 7-सीटर व्हर्जन (Renault Bigster) विकसित करत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतीय ग्राहकांना डस्टर 7-सीटर SUV देखील पाहायला मिळू शकते.
लाँचिंगची तारीख आणि किंमत
रेनॉने जाहीर केले आहे की 26 जानेवारी 2026 रोजी नवी डस्टर अधिकृतरीत्या सादर केली जाईल, तर प्रत्यक्ष विक्री वर्षाच्या शेवटपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनी या SUV मध्ये मोठ्या प्रमाणात लोकलायझेशन (भारतीय उत्पादन घटकांचा वापर) करत आहे, ज्यामुळे तिची किंमत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्पर्धात्मक राहील.
डस्टरसमोर कोणती स्पर्धा?
रेनॉ डस्टरचा मुकाबला आता भारतातील लोकप्रिय SUV – Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Honda Elevate आणि Toyota Hyryder यांच्याशी होणार आहे. कंपनीला विश्वास आहे की “डस्टर” हे नाव, तिचा दमदार लुक आणि सुधारित फीचर्स पुन्हा एकदा भारतीय SUV बाजारात रेनॉला मजबूत स्थान मिळवून देतील.